अहमदनगर | १६ जुलै | आबिदखान
भारतीय लष्करातील पहिले मुस्लिम शहीद ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आलमगीर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले.
ब्रिगेडियर उस्मान यांनी भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानकडून आलेली लष्करी ऑफर नाकारून भारतीय लष्करात राहून सेवा केली. १९४८ साली जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना ते वीरमरण पावले. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना “महावीर चक्र” सन्मानाने गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात बोलताना मखदुम सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. शमा फारुकी म्हणाल्या, “ब्रिगेडियर उस्मान यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. मुस्लिम समाजात असे आदर्श पुरुष जन्माला आले, हे अभिमानास्पद आहे.”
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे सचिव डॉ. कमर सुरुर, अकीला बाजी, मुख्तार शेख, मुख्याध्यापिका शेख जाकेरा, शेख नसरीन बानो, शेख शगूफता, सय्यद शाजिया, सय्यद रफअत, शेख शिरीन आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध बालगीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रम रंगतदार झाला. वह्या वाटपासाठी वसंत पारधे, श्रीकांत सोनटक्के, डॉ. दमन काशीद, हेमंत नरसाळे, चारुता शिवकुमार, विका कांबळे, संजय भिंगारदिवे, अभय कांकरिया, ॲड. गुलशन धाराणी यांचे सहकार्य लाभले.
डॉ. कमर सुरुर यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीचे संस्कार देण्याचे महत्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन आबिद दुलेखान यांनी केले. आभार प्रदर्शन राजुभाई शेख यांनी केले.