अहमदनगर | ६ जुलै | प्रतिनिधी
भारतीय जनसंसदेच्या वतीने जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना एका निवेदनाद्वारे जमिनीच्या ताबेमारी प्रकरणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांनाही सुपूर्द केली आहे.
भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर राजाराम भद्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला कायदेशीर मार्गाने जमिनीचा ताबा घेण्याचा हक्क आहे. मात्र, सध्या नगर शहर आणि तालुक्यातील काही गावांमध्ये जमिनीच्या वाढत्या किंमतीमुळे काही व्यक्ती वादग्रस्त जमिनी खरेदी करत आहेत व त्यावर बेकायदेशीररीत्या ताबा मिळवत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
विशेषतः न्यायालयात प्रलंबित असलेल्या जमिनीच्या प्रकरणांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे ताबेमारीचे प्रकार घडत असून, पोलिस विभागाने याची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. चिचोंडी पाटील गावात दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे ताबेमारी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या सध्या नाशिक कारागृहात मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगर शहर व तालुक्यात सातारा, सांगली, पुणे, संभाजीनगर येथून काही लोक येऊन वादग्रस्त जमिनी खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले असून, या संदर्भातील व्यक्तींची सखोल पार्श्वभूमी तपासली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, चिचोंडी पाटील येथील अक्षय संजय कोळी यांनी या मागणीस विरोध करत आपले स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, जनसंसदेने आपल्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी दै. लोकमत, सायंदैनिक आकर्षण आणि दै. रयत समाचारमधील बातम्यांचे कात्रण जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी विनंती राज्याध्यक्ष अशोक सब्बन, जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, कैलास पठारे, रईस शेख, पोपटराव साठे, रामशेठ धोत्रे, वीरबहादुर प्रजापती यांनी केली आहे.